Monday, July 6, 2009

फुलराणी

हिरवे हिरवे गार गालिचे - हरित तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती - फुलाराणीही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज मने होती डोलत,
प्रणयचंचल त्या भृलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे , गावी गाणी,
याहुनी ठावे काय तियेला - सध्या भोळ्या फुलराणीला?

पुरा विनोदी संध्यावात - डोल डोलवी हिरवे शेत,
तोच एकदा हसत आला - चुंबून म्हणे फुलराणीला
"छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती?
कोण बरे त्या संध्येतून - हळूच पाहते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला आमुच्या राणींना?"
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी.

स्वरभुमिचा जुळवीत हात - नाच नाचतो प्रभातवात ,
खेळूनी दमल्या त्या ग्रहमाला - हळूहळू लागती लपावयाला
आकाशीची गंभीर शांती - मंद मंद ये अवनीवरती,
विरु लागले संशय -जाल - संपत ये विरहाचा काल,
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी - हर्षनिर्भरा नटली अवनी,
स्वप्न संगमी रंगत होती - तरीही अजुनी फुलराणी ती.

तेजोमय नाव मंडप केला - लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळीत मोती - दिव्या वर्हाडी गगनी येती.
लालसुवार्णी जागे घालूनी - हसत हसत आले कोणी,
कुणी बांधिला गुलाबी फेटा - झगमगणारा सुंदर मोठा,
आकाशी चंडोल चालला - हा वांग्निश्चाय करावयाला,
हे थाटाचे लग्न कुणाचे? - सध्या भोळ्या फुलराणीचे.

गाऊ लागले मंगल पाठ - सृष्टीचे गाणारे भट,
वाजवी सनई मारुतराणा - कोकीळ घे ताणावर ताना,
नाचू लागले भारद्वाज - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी हि फुलराणी सुंदर,
लग्न लागले सावध सारे - सावध पक्षी सावध वारे,
दवमय हा अंत:पट फिटला - भेटे रविकर फुलराणीला.

--बालकवी

No comments:

Post a Comment